औरंगाबाद : जगभर थैमान घालणारा कोरोना या संसर्गजन्य आजाराचा रुग्ण शहरात आढळल्यानंतर मनपा प्रशासनाने शहरातील मॉल, चित्रपट गृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नेहमी हजारोंची वर्दळ असणार्या सिद्धार्थ उद्यानाचा मात्र प्रशासनाला विसर पडला होता. आता उशिराने का होईना प्रशासनाला जाग आली आहे. आज सोमवार दुपार पासून उद्यानात पर्यटकांना प्रवेश देणे बंद केले जाणार आहे. असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.
सध्या जगभर कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. अनेक जण मृत्यू मुखी पडत आहे. या आजाराचा पहिला रुग्ण शहरात नुकताच आढळला आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून गर्दी टाळण्याकरिता मनपा प्रशासाने रविवारी दुपारी शहरातील मॉल, चित्रपट गृहे आदी बंद करण्याचे आदेश काढले. परंतु नियमित चार ते पाच हजार पर्यटक भेट देणार्या सिद्धार्थ उद्यान बंद ठेवण्याचा प्रशासनाला विसर पडला होता. विशेष म्हणजे या उद्यानात प्राणिसंग्रहालय असल्याने राज्य, देश तसेच विदेशातील पर्यटक देखील येथे भेट देण्याकरिता येत असतात. यामुळे या ठिकाणी एखादा रुग्ण येऊन गेल्यास आजाराचा फैलाव होण्याची शक्यता अधिक आहे. हा प्रकार उशिराने का होईना प्रशासनाच्या लक्षात आला. यानंतर सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांच्याशी चर्चा केली. यानंतर दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सिद्धार्थ उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.